‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२३ ‘मानवतेसाठी योग’ (Yoga for Humanity)
आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. 27 सप्टेंबर 2014 रोजी UN जनरल असेंब्ली (UNGA) मधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. आज 21 जून 2023 रोजी 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करीत आहोत. यंदाच्या योग दिनाची थीम ही ‘मानवतेसाठी योग’ (Yoga for Humanity) अशी आहे. योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान किंवा विश्रांती यांचा यामध्ये समावेश होतो.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे आपल्याला म्हणता येईल.
भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. 21 जून रोजीच योग दिवस का साजरा केला जातो याला विशेष महत्व आहे. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
योगाचे फायदे
लवचिकता:योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमच्या शाररीक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.
मजबूत स्नायू:योगामुळे तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत होते, तुमच्या मुख्य स्नायूंसह, ज्यामुळे तुमची मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.
तणाव कमी होतो: योगामुळे मन आणि शरीर शांत होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.
झोप सुधारते: योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन शांत झोप घेता येऊ शकते.
ऊर्जा वाढते:योगासने रक्ताभिसरण सुधारून आणि थकवा कमी करून ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करू शकतात.
वजन कमी होणे: योग कॅलरी बर्न करते आणि चयापचय सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मानसिक संतुलन सुधारते: योगामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
जगभरातील लोकांनी चांगले आरोग्य मिळविण्यासाठी योगा कडे वळले पाहिजे.आणि नियमितपणे योग करून स्वतःला निरोगी ठेवावे. तसेच सर्व धर्माचे लोक जाती,पंथ आणि देशाच्या भावनेने उंच उठून प्रेम आणि आत्मीयतेने योगा करावे. हाच हेतू योग दिवस साजरे करण्याचा आहे.योग माणसांना आपसात जोडून परस्पर प्रेम आणि सद्भावतेची भावना विकसित करतो.
दि.21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये, 35 हजार 985लोक आणि 84 देशांच्या प्रतिनिधींनी दिल्लीच्या राजपथवर योगाचे 21आसन केले.योग दिनाच्या पहिल्या समारंभाने दोन गिनीज रेकॉर्ड मिळवले. प्रथम रेकॉर्ड 35 हजाराहून अधिक लोकांसह योगा करणे आणि दुसरे या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या 84 देशांतील लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जगभरात योगाचे महत्त्व 3 दशकात अधिक वाढले आहे.योग आता कोणत्याही देश किंवा धर्माला बांधलेला नाही. योग सीमा ओलांडून घराघरात चांगले आरोग्य मिळविण्यासाठी केले जात आहे.तर आपणही योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य चांगले ठेवूया असा संकल्प करुया. चला योग करुया....
-रणजित पवार, उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
Comments
Post a Comment