‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वी करुया पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सर्वच विभागांनी मिळून यशस्वी करुया, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज केले. मंगळवारी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाबाबत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते. विविध विभागांचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ गावागावात पोहोचविण्यासाठी नियोजन करावे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी एसटी विभागाने एसटी गावात वस्तीला पाठवाव्यात. एसटीमध्येच पाणी, नाश्त्याची व्यवस्था करावी. त्याबरोबरच कार्यक्रमस्थळी देखील पाणी आणि ओ आर एस ची व्यवस्था करावी. एसटी सुस्थितीत असाव्यात. सर्व विभागांनी मिळून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम यशस्वी करुया. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांच्या सोईसाठी रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पाणी या सुविधा ठेवाव्यात. जागेवरच जेवण पुरवावे. गावा-गावात फलक लावावेत. शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, ज्या ज्या योजनेतून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहेत, त्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी निमंत्रित करा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि अधिकाधिक ग्रामस्थांपर्यत पोहोचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनीही या योजनेविषयी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर पालकमंत्र्यांसह सर्वांनी कार्यक्रमस्थळी भेट देवून तयारीची पाहणी केली. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'