सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये दोन पंपांवरील पुरवठा उद्यापर्यंत सुरळीत होणार, पुरवठ्यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जिमाका) :- जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोलपंपांवर पेट्रोलचा एकूण साठा ५ लाख ४३ हजार ५६६ लिटर तर डिझेलचा साठा ३ लाख ८० हजार ७६१ लिटर इतका उपलब्ध आहे. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन केले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील १४ पेट्रोलपंपां पैकी दोन पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या उपलब्धतेसंदर्भात तात्पुरती अडचण निर्माण झाली असली, तरी उर्वरित १२ पेट्रोल पंप नियमितपणे सुरू आहेत. संबंधित कंपन्यांकडून या दोन पंपांसाठी टँकर लोड करण्यात आले असून उद्यापर्यंत पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती विक्री प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाला दिली आहे. पेट्रोल-डिझेलचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या प...