पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पतीचा खून; आरोपीस जन्मठेप

सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का):- कामगार विश्वजित कालिपद मंडळ (वय -34 रा. पश्चिम बंगाल) याचा लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन खून करणाऱ्या आरोपी सुखदेव सोपान बारिक (वय-30 रा. उल्हासनगर) यास भा.दं.वि. कलम 302 अन्वये जन्मठेप, भा. दं. वि. कलम 209 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास, भा. दं. वि. कलम 341 अन्वये 1 महिना कारावास व एकूण 12500/- रु. दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी सुनावली . बांदा गडगेवाडी, ता. सावंतवाडी येथील मकरंद तोरस्कर यांच्या घरी भाड्याने विश्वजीत कालीपद मंडळ, वय 34 मूळ रा. सरईपूर गोलबाघन, जि. परगणा राज्य पश्चिम बंगाल हा कामगार आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होता. सिद्धदोष अपराधी- सुखदेव सोपान बारीक, वय 30 रा. उल्हास नदीचे जवळ रेल्वे पुलाच्या पत्र्याच्या शेडमध्ये, उल्हासनगर, मूळ रा. बाजबेलेनी, ता. गोवरदंगा, जि. उत्तर 24 परगणा राज्य पश्चिम बंगाल याने दि. 5/6/2021 रोजी मध्यरात्री 1 वा.च्या दरम्यान विश्वजीत कालीपद मंडळ याच्या घरात प्रवेश करुन, त्याची पत्नी व दोन मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवले आणि मयतास लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करुन रेल्वेने पळून गेला. या घटनेच्या आधारे बांदा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ / संजय हुंबे यांनी सरकारतर्फे फिर्याद देवून बांदा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 59/2021, भा. दं. वि. कलम 302, 201, 341 अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी बांदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गचे पथक, फॉरेन्सीक लॅब युनिट, सायबर सेलचे पथक यांनी भेट देवून आवश्यक ते पुरावे गोळा केले. बांदा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपी सुखदेव सोपान बारीक हाच असल्याचे निष्पन्न केले व त्यास उल्हासनगर येथून अटक करण्यात आले. त्यास अटक केल्यानंतर त्याने गुन्हयात वापरलेले हत्यार, त्याच्या अंगावरील कपडे मेमोरेंडम पंचनामा करुन हस्तगत केले. गुन्हयाचे तपासात आरोपीचे मयत याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते व त्या प्रेमसंबंधाबद्दल मयत हा विरोध करत होता, म्हणून आरोपीने मयत यास जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. सरकारतर्फे 12 महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या नातेवाईकांनी मयताची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सरकारी पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या उलट तपासात महत्वाच्या कबुल्या मिळून अखेर सत्य बाहेर आले. तसेच, शासकीय वैदयकीय अधिकारी, वोडाफोन कंपनीचे नोडल ऑफिसर व रेल्वे अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकीलांनी वेळोवेळी उच्चतम न्यायालयाच्या न्यायनिवाडयांचा आधार घेतला आणि अखेर क्रूरपणे गुन्हा करणाऱ्या अपराध्यास जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचवले. सदरचा न्यायनिर्णय अति. सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी दिलेला असून आरोपीस भा. दं. वि. कलम 302 अन्वये जन्मठेप, भा. दं. वि. कलम 209 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास, भा. दं. वि. कलम 341 अन्वये 1 महिना कारावास व एकूण 12500/- रु. दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. या गुन्हयाचे उत्कृष्ट अन्वेषण अनिल जाधव, तत्कालीन पोलीस निरीक्षक, बांदा पोलीस ठाणे (सध्या नेमणूक कणकवली पोलीस ठाणे), पोहेकॉ विठोबा सावंत, तात्या कोळेकर, पोहेकॉ संजय हुंबे, पोकॉ विजय जाधव यांनी केले. न्यायालयात अभियोग पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी कामकाज पाहिले. त्यांना सेशन कोर्ट पैरवी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक जयराम पाटील, पोहेकॉ मल्लिकार्जुन ऐहोळी, मपोहेकॉ सिद्धी वेंगुर्लेकर यांनी विशेष मेहनत घेवून उत्तम कामगिरी केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये न्यायालयांच्या पटलावर चालणाऱ्या फौजदारी खटल्यांचे पर्यवेक्षण व पृथक्करण करण्यासाठी ट्रायल मॉनिटरींग सेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांकडून न्यायालयातील फौजदारी खटल्यांचा कामकाजाचा दैनंदिन आढावा घेवून गुन्हयातील आरोपींना दोषसिद्धी होण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातात. अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हेही वेळोवेळी संबंधितांना मार्गदर्शन करीत आहेत. गुन्हेगारांना दोषसिद्धी होण्याचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न नियमीत करण्यात येत आहेत. गुन्हयाचे तपास अधिकारी व त्यांना सहाय्य करणारे अंमलदार, सरकारी अभियोक्ता व त्यांना सहाय्य करणारे पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असल्याने पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'