इतर मागासवर्गीयांसाठी थेट, बीज भांडवल, व्याज परतावा योजना
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.)प्रवर्गातील छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगार करणाऱ्या लाभार्थी करीता १ लाखाची थेट कर्ज योजना, २० टक्के बीज भाडवल कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजनामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रु. १०.०० लाख पर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजना (रूपये १० लाख ते ५० लाख पर्यंत) या योजनाव्दारे इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.)प्रवर्गातील छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगार करणाऱ्यांना शासनाने आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपला व्यापारी आपला व्यवसाय वाढवू शकतील तर तरुणांना स्वयंरोजगार मिळेल.या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेवूया .
रू.१.०० लक्ष पर्यंत थेट कर्ज योजना:- थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रु.१ लक्ष पर्यंत असून या योजनेचा लाभ घेण्याऱ्या लाभार्थीचे वय १८ ते ५५ वर्षे असणे आवश्यक आहे. ग्रामिण तसेच शहरी भागातील कुटुबांचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लक्ष पर्यंत आवश्यक आहे. लाभार्थीचा सिबील स्कोअर किमान ५०० असलेल्या लाभाथ्यांना हे कर्ज दिले जाते. कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्षांचा असून परतफेडीचा दरमहा हप्ता रुपये २०८५/- इतका आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्याना व्याज आकारण्यात येत नाही. सदर योजनेचे कर्ज अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
२० % बीज भांडवल योजना : या योजनेची उच्चतम मर्यादा रु.५.०० लाख पर्यंत असून कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्ष इसका आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांचा सहभाग ५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के व बँकेचा सहभाग ७५ टक्के इतका आहे. यातील महामंडळाच्या सहभागावरील रक्कमेवर द.सा.द.शे ६ टक्के व्याजदराने परतफेड करावी लागते.
वरील दोन्ही योजनांसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, तहसिलदार, नायब तहसिलदर यांनी दिलेला उत्पनाचा दाखला (ग्रामीण व शहरी भागाकरीता कुटुबांचे वार्षिक उत्पन्न रू.१ लक्ष पर्यंत) सक्षम अधिकाऱ्याने दिलेले इतर मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र, दरपत्रक (कोटेशन) प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, महाराष्ट्र रहिवासी दाखला (डोमिसाइल) किंवा रहिवासी दाखला, वयाच्या पुराव्याकरीता शाळा सोडल्याचा किंवा जन्म दाखला, थेट कर्ज योजनेकरीता अर्जदाराचा सिबील क्रेडीट रिपोर्ट (सिबील स्कोअर किमान ५०० असावा), आधारकार्ड लिंक पासबुकची झेरॉक्स, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इत्यादी कागदपत्रे लागतात.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :- या योजना संपूर्णपणे संगणीकृत (ONLINE) आहे. या योजनेमध्ये बँकेने रु. १० लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. योजनेचा कालावधी ५ वर्षे असेल. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८ लाख पर्यंत (तहसिलदार यांचा उत्पन्न दाखलानुसार), कुटुंबातील एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलवर ऑनलाईन पाध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणकीकृत सशर्त हेतूपत्र (Lettrer of Intent) दिले जाईल. अर्जदारास याआधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
गट कर्ज व्याज परतावा योजना :- योजना संपूर्णपणे संगणीकृत (ONLINE) आहे. या योजनेतंर्गत रु. १० लाख ते ५० लाख पर्यंत कनांची मर्यादा असून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LL.P,FPO अशा शासनमान्य प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा बैंक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
गटातील सर्व सदस्याचे वय १८ ते ४५ वर्षे असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.८.०० लाखपर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु. १० लाख ते ५०.०० लाखापर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सर्व सदस्यांचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान ५०० इतका असावा. या कर्जाची परतफेड कालावधी ५ वर्षे किवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल याकरीता राहील. कर्ज मंजूर झालेल्या गटाने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास (जास्तीत जास्त १२ टक्के व्याजदराच्या किंवा १५ लाखाच्या मर्यादेत) व्याज परतावाची रक्कम त्यांच्या आधारलिंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलवर Group Loan ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter Of Intent) दिले जाईल. या गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
वरील दोन्ही योजनांसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:- योजनेकरीता इमाव प्रवर्ग जातीचा दाखला, तहसिलदार यांचा उत्पन्न दाखला रु.८.०० लाख पर्यंत, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक, जन्म, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा रहिवासी दाखला, रहिवासी पुरावा म्हणून गॅस बुक, पासपोर्ट, लाईट बोल, भाडेकरार इ. व्यवसायासंबंधित असणारे कागदपत्रे इ. आवश्यक आहेत.
इच्छुक गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तीनी योजनेच्या अधिक माहितीकरीता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. चे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ( दुरध्वनी क्रमांक ०२३६२ २२८११९) किंवा dmobcsindhudurg@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
-रणजित पवार, उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
000000
Comments
Post a Comment