सखी निवास योजना राबविण्याकरिता संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १ सखी निवास कार्यान्वित करायचे असून जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी भाडे तत्वावरील इमारती मध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केल्यानुसार विहित पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात योजने अंतर्गत सखी निवास योजना राबविण्यास इच्छुक संस्था/एजन्सी यांनी विहित वेळेत प्रस्ताव सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या ०२३६२-२२८८६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीच्या पद्धतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता मिशन शक्ती अंतर्गत सखी निवास या योजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नवीन ५० सखी निवास भाडे तत्वावरील इमारती मध्ये प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन याकरिता अनुदानासह कार्यान्वित करावयाची आहेत. महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून दिनांक ३ जून २०२३ रोजी सर्व जिल्ह्यांतील आघाडीच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, योजनेचे निकष, शासन निर्णय, अर्जाचा नमुना, अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, इमारतीचे निकष इ. सर्व माहिती महिला बालविकास आयुक्तालयाच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर निकषानुसार केंद्र शासन पुरस्कृत सखी निवास योजना कार्यान्वित करून याविषयी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासननिर्णय व सूचना यानुसार योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था व एजन्सी यांजकडून दि. ३० जून २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, ए-ब्लॉक, तळमजला, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे एकूण ५ प्रतींमध्ये पृष्ठ क्रमांक नमूद करून प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तसेच प्रस्ताव हे विहित नमुन्यात व त्यातील सर्व रकान्यामधील माहिती भरून तसेच आवश्यक ते कागदपत्रे/प्रमाणपत्रे सोबत जोडूनच सादर करण्यात यावेत. प्रस्ताव सादर करताना इमारत मालकासोबत केलेला करारनामा नोटरी स्वरुपात असला तरी चालेल. परंतु संस्थेस योजना राबविण्यास मान्यता मिळाल्यास मान्यता मिळाल्याच्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत नोंदणीकृत भाडे करारनामा सादर करणे आवश्यक राहील. सदर प्रस्ताव दि. ३० जून २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंतच स्वीकारले जातील. त्यानंतर मुदती नंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'