पी एम किसान योजना लाभासाठी 20 व 21 जूनच्या शिबीरात सहभागी व्हावे
सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी एम किसान) अंतर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 20 व 21 जून रोजी संपूर्णतः पी एम किसानचे काम करण्यासाठी गावोगावी कृषी सहाय्यकांमार्फत सकाळी 8 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. या शिबीरामध्ये संपूर्ण कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट खाते, बँका तसेच सामाईक सुविधा (CSC) हे सहभागी होणार आहेत. तरी याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे राज्यात दिनांक १ मे पासून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. राज्यात सद्यस्थितीत जवळपास 10 लाख व 18 लाख लाभार्थीची अनुक्रमे बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. या कॅम्पची पूर्वतयारी कृषी विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून कृषी सहाय्यकांना गावे वाटप करण्यात येऊन प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कॅम्पबाबत प्रत्येक गावामध्ये नोटीस लावणे, दवंडी देणे तसेच व्हाट्सअप ग्रुपवर प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांनी कॅम्पमध्ये सहभागी होऊन त्यांची ई-केवायसी करणेसाठी कृषी विभागाच्या मदतीने पी एम किसान पोर्टलवरील Farmers corner मधील ई-केवायसी - OTP आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र (CSC) च्या मदतीने अथवा पी एम किसानच्या नवीन अँप्पद्वारे Face authentication च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर कॅम्पवेळी बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा सदर कॅम्पवेळी पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडावे व 14 व्या हप्त्याचा लाभ घ्यावा.
00000
Comments
Post a Comment