आमदार दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी

सिंधुदुर्गनगरी दि. १३ (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज आमदार दिपक केसरकर यांच्या समवेत सावंतवाडी नगरपरिषदेच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी योजनेच्या कामाचा सर्वंकष आढावा घेऊन उर्वरित कामे विहित मुदतीत, दर्जेदार व समन्वयातून पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. आमदार दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी झिरंग परिसरातील उभारण्यात आलेल्या उंच पाण्याच्या टाकीची पाहणी करून योजनेच्या प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला. त्यानंतर झिरंग, आत्मेश्वर मंदिर, माठेवाडा परिसर तसेच वनविभागाच्या हद्दीतील भागात टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनसाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतरच्या रस्ते पुनर्स्थापना (रोड रिस्टोरेशन) कामांची तपासणी केली. या कामांचा दर्जा, प्रगती आणि नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सावंतवाडी शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, संबंधित सर्व विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पीएमसी संस्था, मक्तेदार आणि नगरपरिषद यांनी परस्पर समन्वयातून कामांना गती देत प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी दिले. यानंतर नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत योजनेच्या कामाची सद्यस्थिती, प्रगती, अडचणी आणि पुढील कृती आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणीवेळी नगराध्यक्षा श्रद्धा लखम भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजेश कुलकर्णी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पर्यटन समिती सभापती मोहिनी मडगांवकर, नियोजन सभापती मोतीराम नेवगी, नगरसेविका सुकन्या टोपले, ॲड. सायली काशीनाथ दुभाषी, नगरसेवक खेमराज कुडतरकर, देवेंद्र टेमकर, तौकीर शेख, पीएमसी ॲक्वॉकॉन कन्सल्टंट ॲण्ड इंजिनिअर्स प्रा. लि.चे राहुल सूर्यवंशी तसेच मक्तेदार विलास एस. जगताप उपस्थित होते. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'