भात व नाचणी पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी,दि. 7 (जिमाका):- खरीप हंगाम २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. भात व नाचणी पिकासह विविध पिकांसाठी उत्पादनावर आधारित पीक विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक अर्जासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. खरीप हंगामात भात व नाचणी ही अधिसूचित पिके असून, शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या केवळ १ टक्के एवढाच विमा हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच भात पिकासाठी रुपये ६५० व नाचणी पिकासाठी रुपये ४०० एवढा विमा हप्ता भरावा लागणार आहे. यावर्षी नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगातून मिळालेल्या उत्पादनास ५० टक्के आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के वजन देऊन सरासरी उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे नुकसान भरपाई अधिक वैज्ञानिक व पारदर्शक पद्धतीने निश्चित होणार आहे. भात व नाचणी पिकाच्या विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावा. शासनाने बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकरणांमध्ये संबंधित अर्ज रद्द करून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित लाभार्थ्यास कृषी विभागाच्या विविध DBT योजनांपासून पाच वर्षे वंचित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत पीक नोंदणी करून डिजिटल क्रॉप सर्व्हे पूर्ण करावा आणि अंतिम मुदतीपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. 000000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'