दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग ॲक्शन मोडवर खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यात चालू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठांचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग ॲक्शन मोड मध्ये आला असून विनापरवाना खते, बियाणे व किटकनाशके विकणाऱ्यांवर कृषि विभागाची करडी नजर आहे. जिल्हा भरारी पथकामार्फत केलेल्या कारवाई मध्ये विनापरवाना व बेकायदेशीररित्या खत, बियाणे व किटकनाशके विक्री करणाऱ्या 3 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात सर्व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगामांत मोठ्या प्रमाणात भात बियाणे तसेच आंबा, काजू व इतर फळपिकांसाठी रासायनिक खतांची आवश्यकता असते. खते, बियाणे व किटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षांकांद्वारे नियमित तपासणी करण्यात येत असून निविष्ठांचे नमुने तपासणीकरिता घेण्यात येतात. तपासणीअंती त्रुटी आढळून आल्याने 2025-26 या वर्षात खताचे 11 परवाने निलंबित, बियाणे 6 परवाने रद्द व किटकनाशक 1 परवाना निलंबीत केले असून 2026-27 या चालू वर्षात खताचे 8 परवाने रद्द व 4 निलंबित, बियाणे 2 परवाने रद्द तर किटकनाशकाचे 2 परवाने रद्द व 1 निलंबित केला आहे.
भरारी पथकामार्फत केलेल्या कारवाई मध्ये विनापरवाना खत विक्री करणाऱ्याच्या विरोधात 2025-26 मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून 3.30 लाख रुपये किमतीचा 9.2 मे. टन साठा जप्त करण्यात आला असून 2026-27 या चालू वर्षात विनापरवाना खत विक्रीविरोधात 3 फौजदारी गुन्हे दाखल करून 2.53 लक्ष रुपये किमतीचा 5.733 मे. टन साठा जप्त केला. विनापरवाना बियाणे विक्रीविरोधात 1 फौजदारी गुन्हा दाखल करून 11 हजार 765 रुपये किमतीचा 74 किलो साठा जप्त व विनापरवाना किटकनाशक विक्री विरोधात 1 फौजदारी गुन्हा दाखल करून 2.33 लाख रुपये किमतीचा 316 लिटर/किलो साठा जप्त करण्यात आलेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी पुढीलप्रमाणे खतांचा पुरवठा झालेला असून ( आकडेवारी मे. टन मध्ये) युरिया 5293.9, एनपीके संयुक्त खते 4642.6, एसएसपी 1240.2, एमओपी 353.7 व डीएपी 110.3 आज रोजी जिल्ह्यामध्ये शिल्लक खत पुढीलप्रमाणे ( आकडेवारी मे. टन मध्ये) युरिया 2015, एनपीके संयुक्त खते 1804, एसएसपी 576, एमओपी 206 व डीएपी 31 आहे.
खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी अत्यंत जागरूक रहावे. कृषि निविष्ठा अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून कराव्यात तसेच निविष्ठा खरेदी करताना त्यावर लिहिलेली पॅकिंग तारीख, अंतिम तारीख, लेबल क्लेम इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. परिपूर्ण असलेले खरेदीचे पक्के बिल संबंधित विक्रेत्याकडून न चुकता घ्यावे व ते जपून ठेवावे. अनुदानित रासायनिक खते खरेदी करताना आधार कार्ड वापर करूनच खरेदी करावी. जादा दराने खते, बियाणे खरेदी करू नयेत. जिल्ह्यात कोणीही अनधिकृत, विनापरवाना किवा चढ्या दराने खते, बियाणे व किटकनाशके विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कृषि विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment