जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जिमाका) : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दिनांक 10 जुलै 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल ओरोस येथे जागतिक लोकसंख्या दिन या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) आर.व्ही. नडगदल्ली, व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी अवधूत मालणकर, संस्था अध्यक्ष मनिष पारकर, शालेय समिती अध्यक्ष एस. एम. राणे, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मधील लिपिक मिलिंद रासम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक ए. पी. गिते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एम. राणे यांनी केले. तसेच मार्गदर्शन करताना श्री. नडगदल्ली यांनी सांगितले की, दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिनाचा उद्देश वाढती लोकसंख्या, आरोग्य, शिक्षण, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता आणि शाश्वत विकास या विषयांबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे हा आहे. सन 1989 मध्ये United Nations Development Programme (UNDP) यांनी या दिनाची सुरुवात केली असून, 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या पाच अब्ज झाल्याच्या टप्प्यामुळे या उपक्रमाची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम समजून घेणे, कुटुंब नियोजनाचा स्वीकार, मातृ-बाल आरोग्याचे संरक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी केवळ शिक्षण घेण्यापुरती मर्यादित नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनजागृती यांद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष अवधूत मालणकर यांनी मानले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'