विशेष लोक अदालतीत 46 धनादेश अनादर प्रकरणांचा तडजोडीने निकाल
सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जुलै 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे NI Act 1881 कलम 138 अंतर्गत प्रलंबित धनादेश अनादर प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
या विशेष लोक अदालतीसाठी जिल्हा न्यायालयात एक आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये अशी एकूण सात पॅनेल कार्यरत होती. जिल्हा न्यायालयातील पॅनेलमध्ये दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. जे. पाटील आणि विधीज्ञ प्रसाद सावंत यांनी कामकाज पाहिले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ए. जी. देर्शिगकर उपस्थित होते.
विशेष लोक अदालतीला पक्षकार, विधीज्ञ, न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांतील न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पोलीस विभाग आणि विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
या विशेष लोक अदालतीमध्ये एकाच दिवशी एकूण 46 प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 51,15,870 रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. विशेष लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांच्यातील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच सदर तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
Comments
Post a Comment