जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न सिंधुदुर्गनगरी,दि. 7 (जिमाका):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिरकणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे, , यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृह वर्ग-१, सिंधुदुर्ग-ओरोस येथे जिल्हा कारागृहातील शिक्षाधिन / न्यायाधिन बंद्यांकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व जिल्हा कारागृह वर्ग-१, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीमध्ये सात दिवसीय योग शिबीर घेण्यात आले होते. या सात दिवसांच्या शिबिरामध्ये बंद्यांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या योगाभ्यासाचे प्रशिक्षण देण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन सकारात्मक विचारसरणी विकसित होते, आत्मविश्वास वाढतो आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. जी. देशिंगकर, सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. नडगदल्ली, उपमुख्य लोक अभिरक्षकच्या विधीज्ञ उल्का पावसकर, वर्ग-सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह अधीक्षक एस. यु. कांबळे तसेच योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. योग शिबीराच्या समारोपप्रसंगी सहभागी बंद्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास तसेच सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या शिबीरामध्ये कारागृहातील सर्व बंद्यांनी सहभाग घेतला. सात दिवसांच्या योग शिबिरामुळे बंद्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी मन शांत राहण्यास, विचारांमध्ये सकारात्मकता येण्यास तसेच मानसिक स्थैर्य प्राप्त होण्यास मोठी मदत झाली व प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे मनावरील ताण कमी झाला असून राग, चिडचिड आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक बंद्यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर अधिक हलके व उत्साही वाटू लागले, झोपेची गुणवत्ता सुधारली, श्वसनक्रिया अधिक सुरळीत झाली आणि दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा व एकाग्रता वाढल्याचा अनुभव व्यक्त केला. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'