बेरोजगार युवकांसाठी रोजगार योजना
सिंधुदुर्गनगरी ( जिमाका ) 20 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), पी.एम. विश्वकर्मा योजना तसेच मधकेंद्र योजना,मधाचे गाव योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी "मधकेंद्र योजना" आणि "मधाचे गाव योजना" राबविण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य, अनुदान तसेच विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरी इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारावा, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्गचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
मधकेंद्र योजनेचा उद्देश मधमाशी पालनाला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण करणे आहे. यासाठी मधमाशी पेटी, वेष, स्मोकर, मधमाशी वसाहत व इतर साहित्य ५०% स्वगुंतवणूक व ५०% शासन अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे १० दिवसाचे प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. मधकेंद्रातून उत्पादन झालेल्या मधासाठी खादी मंडळामार्फत बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार साक्षर असणे आवश्यक आहे. अर्जदाराची स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
मधाचे गाव योजनेचा उद्देश मधमाशा पालनासाठी पोषक वातावरण असलेल्या गावाची निवड करून त्या गावाला "मधाचे गाव" म्हणून विकसित करणे हा आहे. याद्वारे लाभार्थ्यांना १०% स्वगुंतवणूक व ९०% शासन अनुदानावर मधपेटी उपलब्ध करून दिले जातात. मधाच्या गावातील लाभार्थ्यांना एकत्रित प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. सामुहिक सुविधा केंद्र, माहिती दालन स्थापित करणे, मधुबन उभारणी हे उपक्रम मधाच्या गावामध्ये राबविण्यात येते.
इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधून योजनांची सविस्तर माहिती घ्यावी व अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रविंद्र कुडाळकर बिल्डिंग, २ रा मजला, पंचायत समिती नजिक, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. dviosindhu@rediffmail.com संपर्क क्रमांक - ०२३६२-२२२२२० येथे संपर्क करण्याचे आवाहनही प्रसिध्दीपत्रकात केले आहे.
000000
Comments
Post a Comment