सिंधुदुर्गातील हिट अँड रन प्रकरणात मृताच्या वारसांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणातील मृत महिलेच्या वारसांना शासनाच्या हिट अँड रन नुकसान भरपाई योजनेअंतर्गत 2 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. दि. 12 जुलै 2024 रोजी हेमलता मनोहर देसाई व वैशाली विश्वास देसाई (रा. निमजगा-बांदा, ता. सावंतवाडी) या बांदा येथील एस.टी. स्थानकाकडे जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने कोणतीही माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पलायन केले. या अपघातात हेमलता मनोहर देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे निधन झाले. या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक अजित मनोहर देसाई यांनी दि. 19 सप्टेंबर 2024 रोजी हिट अँड रन नुकसान भरपाई योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर केला होता. त्यानंतर संबंधित प्रस्तावाची समितीने अर्जाची छाननी करून मृताच्या कायदेशीर वारसांना 2 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केली. हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना 2 लाख रुपये तर गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीस 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येते. नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी जिल्हास्तरावर सात सदस्यीय समिती कार्यरत असून जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत. उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच एका स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य असतात. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'