प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026' साठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र बालकांनी तसेच त्यांच्या पालकांनी 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार 31 जुलै 2026 रोजी 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंत वय असलेल्या आणि आपल्या उल्लेखनीय कार्याने समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो. पुरस्कारासाठी शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी केलेल्या बालकांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्जदार बालक भारताचा नागरिक व रहिवासी असणे आवश्यक आहे. 31 जुलै 2026 रोजी वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षांपेक्षा कमी असावे. अर्जातील विशेष कामगिरी किंवा शौर्याची घटना अर्जाच्या अंतिम दिनांकापासून मागील दोन वर्षांच्या कालावधीत घडलेली असावी. यापूर्वी हा पुरस्कार प्राप्त झालेल्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. इच्छुकांनी केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. स्वयं-नामांकन (Self-Nomination) करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. 31 जुलै 2026 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर कोणत्याही स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'