15 ते 30 जुलैदरम्यान जिल्हाभर शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा विशेष शोध अभियान
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जिमाका) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत 6 ते 18 वयोगटातील प्रत्येक बालक शाळेच्या मुख्य प्रवाहात यावे आणि त्यांचे शिक्षण अखंडित राहावे, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 ते 30 जुलै 2026 या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा विशेष शोध व सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांच्या सर्वेक्षण जिल्हा समितीच्या सचिव सविता परब यांनी दिली.
या सर्वेक्षणात दिनांक 15 ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरीत कुटुंबामधून करण्यात येणार आहे. तसेच मागास, वंचित गटातील व अल्पसंख्याक गटातील वस्तीतील बालकांची माहिती सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व खेडी, गावे, वाडी, तांडे व शेतमळ्यात, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाहय बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे. महिला बालविकास अंतर्गत बालगृह/ निरीक्षण गृह / विशेष दत्तक संस्था यामधील बालकांचाही या मिशन मध्ये समावेश करण्यात येणार आहे. एकही शाळाबाह्य / स्थलांतरीत बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजन करण्याची दक्षता आपल्या प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे.
तसेच सर्वेक्षण कालावधीनंतर शाळेच्या सर्वेक्षण क्षेत्रात RTE Act व बालहक्क कायद्यानुसार दाखलपात्र मुल शाळाबाह्य आढळून आल्यास संबंधित कारवाईस पात्र ठरतील. तरी आपण आपल्या शाळेच्या सर्वेक्षण क्षेत्रात सतत अशा मुलांचा शोध घेऊन नियमित शाळेत दाखल करण्यात येणार आहे व त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित होवून जाणाऱ्या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास कार्यालयमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस हे ग्रामिण व नागरी भागात 03 ते 06 या वयोगटातील, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या कार्यालयामार्फत प्राथमिक शिक्षक ग्रामीण व नागरी भागात 06 ते 14 या वयोगटातील, शिक्षण विभाग (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या कार्यालयामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक ग्रामीण व नागरी भागात 14 ते 18 या वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण होणार आहे. या सर्व यंत्रणेचे तालुकास्तर व जिल्हास्तरावरुन पर्यवेक्षण होणार आहे.
विशेष मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्यापासून गाव व वार्डरापर्यंत विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी असून मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, पोलीस अधीक्षक, समाजकल्याण अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे
तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत राहणार असून गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी सदस्य असतील. केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत राहील, निवडक 5 शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, विषयतज्ज्ञ, बालरक्षक, केंद्रीय मुख्याध्यापक सदस्य राहतील, गावस्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि अंगणवाडी सेविका सहभागी राहतील.
विशेष मोहिमेमध्ये महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांच्या सहभागाने व सहकार्याने हे मिशन राबविण्यात येणार आहे.
शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये विशेष शोध मोहिम राबवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मागील वर्षी दिनांक 01 जुलै ते 15 जुलै 2025 या कालावधी मध्ये शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यामध्ये कुडाळ तालुक्यात 10 मालवण तालुक्यात 6 व कणकवली तालुक्यात 1 असे एकुण 17 विद्यार्थी शाळाबाह्य आढळले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आलेले आहे.
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांच्या सर्वेक्षण जिल्हा समितीच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शाळाबाह्य, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अनियमित व स्थलांतरीत मुलांच्या सर्वेक्षण जिल्हा समितीचे सहअध्यक्ष रविद्र खेबूडकर तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हा परिषद प्रितेश सभापती राऊळ,शिक्षण, वित्त व बांधकाम समितीचे सभापती संतोष साटविलकर, महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण समितीच्या सभापती रुहिता राजेश तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनांनुसार हे सर्वेक्षण होणार आहे.
000000
Comments
Post a Comment