मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद 43 विशेष आरोग्य शिबिरांत 2 हजार 464 बालकांची आरोग्य तपासणी
सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात आलेल्या ‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. 7 ते 22 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 43 विशेष आरोग्य शिबिरांमध्ये 2 हजार 464 बालकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली.
या अभियानांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुला-मुलींसाठी कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला आणि देवगड तालुक्यांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये बालकांमधील विविध आजार, जन्मजात दोष, पोषणासंबंधी समस्या तसेच इतर आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार पुढील उपचार, तज्ज्ञांचा सल्ला व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या अभियानामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली. पालकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य अधिक सक्षम व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), स्थानिक प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविकांनी मोलाचे सहकार्य केले.
000000
Comments
Post a Comment