अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरताना सावधगिरी बाळगावी
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जिमाका) : उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना घाईगडबडीत किंवा तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणास्तव घेतलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडला, तर त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना सावधगिरी बाळगावी असे, आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
अनेक विद्यार्थी 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी किंवा कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न करतात. मात्र, प्रवेश प्रक्रियेत अपेक्षित जागा न मिळाल्यास किंवा गॅप टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए. बीएससी किंवा बीकॉम सारख्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. याच काळात विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि त्यांना लाभही मिळतो. परंतु, पुढील शैक्षणिक वर्षात जेव्हा या विद्यार्थ्यांची निवड प्रत्यक्ष हव्या असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (उदा. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक) होते, तेव्हा तांत्रिक नियमांमुळे त्यांना त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळणे कठीण होते. त्यामुळे एकदा शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, नवीन घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या 'अपात्र ठरतो.
शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते. एकदा ही रक्कम जमा झाल्यानंतर, ती पुन्हा शासनाला चलनाद्वारे परत करण्यासाठी कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत. परिणामी, एकदा चूक झाल्यास विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीचा लाभ कायमचा गमवावा लागतो, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
अशा प्रकारचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या वेळीच योग्य समुपदेशन करावे, तसेच त्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापूर्वी नियमांची सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणार असाल आणि सध्या केवळ 'बॅकअप' म्हणून बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल, तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापूर्वी महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाशी सविस्तर चर्चा करावी.
0000000
Comments
Post a Comment