स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.) : ‍भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घटनांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फूल्लिंग कायम तेवत रहावे. देशभक्तीची जाज्वल भावना कायम जनमानसात रहावी, या उद्देशाने देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत केले. पंचायत समिती कणकवली येथे नागरिकांना तिरंगा उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, तहसिलदार आर. जे. पवार यांच्या उपस्थित करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख पन्नास हजार निवासी घरे असून प्रत्येक घरांना तिरंगा झेंडे पुरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, बचतगट यांच्यामार्फत ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद यांना झेंडे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केलेले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधून तिरंगा झेंडे खरेदी करून घरोघरी 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत ध्वजारोहण करुन या उपक्रमात सहभागी व्हावे. स्वराज्य सत्ताच्या निमित्तांने स्वच्छता मोहिम, प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, वकृत्वस्पर्धा, चित्रकला अशा विविध कार्यक्रम होत आहे. कोणत्याही परिस्थितीत प्लॉस्टिकच्या झेंड्याचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. ग्रामीण भागात ग्रामपंचायत पंचायत समिती मार्फत तिरंग्याची उपलब्धता - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावर तिरंगा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी संपर्क करुन ध्वजसंहितेचे पालन करुन उत्साहाने सहभागी व्हावे आणि देशाचा अमृत महोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. घरोघरी तिरंगा उपक्रम राबविताना ध्वजसंहितेचे पालन होईल याची दक्षता घ्यावी - पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्वच नागरिकांनी या उपक्रमात आपल्या घरांवर तिरंगा फडकवून सहभागी व्हावे. ध्वजसंहितेचे पालन होईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले. तिरंगा फडकविण्याचे नियम तिरंगा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजुस असावा. तिरंगा झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असेल अशाच प्रकारे झेंडा फडकवावा. घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत फडकलेला असेल. दररोज सायंकाळी तिरंगा उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांनी ध्वजसंहिता पाळावी. तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मामानाने व सुरक्षित ठेवावेत. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये तो सन्मानाने जतन करुन ठेवावा. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कोणत्याही परिस्थितीत लावला जावू नये. तिरंगा विक्री बाबत व्यापा-यांना आवाहन सदरच्या उपक्रमांतर्गत व्यापा-यांनी प्लास्टिकच्या झेंड्यांची विक्री करू नये. तिरंगा फडकविण्यासाठी कापडी झेंड्यांचा वापर करावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'