शासन मान्यता नसलेल्या अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत विविध कौशल्य, व्यवसाय शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम मान्यताप्राप्त संस्थांमधून चालवले जातात. परंतू काहीवेळा शासन मान्यता नसलेल्या, अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त असल्याचे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते व नंतर विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. तरी प्रवेशोच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी खात्री करूनच संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा व फसवणूक टाळावी असे आाहन योगेश पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मडंळ, मुंबई यांनी केले आहे. कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अभ्यासक्रम व संस्थांना मंडळ तसेच राज्य व प्रसंगी केंद्र शासनाची मान्यता असणे आवश्यक आहे. मंडळाच्या https://msbsd.edu.im या संकेतस्थळावर सक्षम प्राधिकरणांची मान्यता असलेल्या संस्था व सदर संस्थेत चालविल्या जाणाऱ्या अधिकृत अभ्यासक्रमांची यादी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य कृषी, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम 2013 (सन 2013 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 20) करण्यात आला आहे. यानुसार प्रकरण 2, कलम 3 अन्वये महाराष्ट्र राज्यात व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था करण्यास आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरू करण्यात व जाहिरात करण्यात मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाची मान्यता व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांची सलग्नता नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनधिकृत संस्थेच्या भूलथापांना, त्यांच्या खोट्या दाव्यांना व जाहिरातींना बळी न पडता संस्था व अभ्यासक्रमांची खात्री करुनच प्रवेश घ्यावा. तसेच अनधिकृत संस्थांच्या तक्रारीबाबत मंडळ, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अथवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'