करुळ घाटातून 25 ऑगस्टपर्यंत जड व अवजड वाहतूक बंद
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील गगनबावडा घाटात संरक्षण भिंत दरीत कोसळून सदर रस्ता जड व अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित झालेला आहे. त्यामुळे सदर रस्ता दि. 25 ऑगस्ट पर्यंत जड व अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढली आहे.
या अधिसूचनेनुसार गगनबावडा घाटातील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम विना अडथळा पूर्ण होण्यासाठी मौजे एडगाव ( एडगाव तिठा) ते करुळ घाट ता. वैभववाडी, गगनबावडा हद्दीपर्यंत जड व अवजड वाहनांची वाहतूक दि. 25 ऑगस्ट 2022 पर्यंत बंद करुन कोल्हापूर वरुन येणारी अवजड वाहने खंडासरी ( क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी कडे तसेच गोवा वरुन कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्यावरुन फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने मार्गस्थ होतील.
मोटार वाहन कायदी 1988 मधील कलम 115 व गृह विभागाकडील अधिसूचना क्र.एमव्हीए 0589/सीआर1061 डीआरए 2 दि. 19 मे 1990 नुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दि. 25 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील मौजे एडगाव (एडगाव तिठा) ते करुळ घाट ता. वैभववाडी – गगनबावडा हद्दीपर्यंत महामार्ग हा सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतुक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतुक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची कार्यवाही करावी असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.
00000
Comments
Post a Comment