प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 31 ऑगस्टपर्यंत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020 -21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबवली जात आहे. या योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण 60:40 असे आहे. या योजनेत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असून योजनेला व्यापक स्वरुप देण्यासाठी दि. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
या पंधरवड्यात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत बँकांकडे जे प्रकल्प आराखडे मंजुरीसाठी सादर केले आहेत त्यांचे बँक शाखा व्यवस्थापकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची बँक अधिकाऱ्यांसमक्ष पडताळणी करुन त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात येईल. तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करुन जिल्हा नोडल अधिकाऱ्यांमार्फत विहीत कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन प्रस्ताव बँकेकडे मंजुरीसाठी सादर करतील. याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी सनियंत्रण करतील. जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रस्ताव बँक, संबंधित कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, बँक शाखा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल व त्याचे सनियंत्रण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे जिल्हा नोडल अधिकारी यांच्या मदतीने करतील अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment