वेंगुर्ला-दाभोलीत लोकसहभागातून भव्य वनराई बंधाऱ्याची उभारणी जिल्ह्यात लोकसहभागातून चार हजार वनराई बंधारे - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग,(जिमाका)दि. ९ : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून भव्य तीन वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. सुमारे ७५ फूट लांबीच्या एका बंधाऱ्यासाठी एक हजार पोत्यांचा वापर करण्यात आला असून, सुमारे २५० ग्रामस्थांनी श्रमदानातून या जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी गाव सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी ग्रामदैवताला गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी उप विभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, पंचायत समिती सदस्य शंकर घोट, शीतल राऊत, उप सभापती सचिन देसाई, मंगेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी ग्रामस्थ, महिला बचत गट, शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिक स्वतःहून श्रमदानासाठी पुढे येत आहेत, ही बाब अत्यंत आशादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता लोकांनी स्वतःच्या श्रमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. मागील आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यात लोकसहभागातून चार हजार हून अधिक बंधारे उभारण्यात आले असून, ही चळवळ प्रशासन आणि जनतेतील समन्वयाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. दाभोली येथील वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी सदस्यांनी समन्वयाने तांत्रिक नियोजन केले. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील सुमारे चार ते पाच किलोमीटर क्षेत्रातील पाणी टिकून राहण्यास मदत होणार असून, आजूबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही हातभार लागणार आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे जमिनीत जिरवण करणे आणि भूजलपातळी वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. गावाची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन वनराई बंधारा उभारलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्क्या बंधाऱ्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गावातील जलतारा कामाचे उद्घाटन करण्यात आले. वनराई बंधारे, जलतारा आणि नदी-नाल्यांतील गाळ काढणे अशा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. या कामांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, कृषी विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणांनी स्थानिक गरजेनुसार नियोजन करून लोकसहभागाला अधिक बळ द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'