आंब्रड येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या १३ योजनांसाठी मेगा ड्राइव्ह कॅम्प

सिंधुदुर्ग, दि. १६ (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे १३ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २५ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मेगा ड्राइव्ह कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी भेटी देऊन संभाव्य लाभार्थ्यांचा शोध घेण्यासह कायदेविषयक जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून २७ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत आंब्रड येथे सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी ग्रामस्थांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या १३ योजनांची माहिती देऊन त्यांचे महत्त्व आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रविण हिर्लेकर, ग्रामपंचायत अधिकारी स्नेहा पाटील, सरपंच मानसी कदम, उपसरपंच विठ्ठल तेली तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत आंब्रड येथे विधी सेवा केंद्राची (Legal Aid Clinic) स्थापना करण्यात आली. २६ ऑगस्टपासून विधी स्वयंसेवकांनी घरोघरी भेटी देऊन संभाव्य लाभार्थ्यांचा शोध घेतला. या प्रक्रियेत प्राथमिक स्वरूपात ३१ लाभार्थी आढळून आले. त्यांच्या गरजांनुसार अर्ज प्राप्त करून संबंधित शासकीय कार्यालयांशी समन्वय साधण्यात आला, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देता येईल. विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन ९ सप्टेंबर रोजी श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, पॅनल विधिज्ञ अॅड. आशपाक शेख, अधीक्षक एस. डी. गिरकर आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते. बालकांचे संरक्षण, कायद्याविषयी जागरूकता आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी याच विद्यालयात मूलभूत कर्तव्ये आणि अंमली पदार्थांचे सेवन या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कायद्याविषयी आदर आणि व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती ८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परबवाडा-आंब्रड येथे पोषण माह सप्ताहानिमित्त हुंडाबळी आणि सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अॅड. श्वेता तेंडुलकर आणि अॅड. रुचा लोखंडे उपस्थित होत्या. महिलांना सामाजिक अनिष्ट प्रथा आणि त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अॅड. श्वेता तेंडुलकर यांनी हुंड्याच्या मागणीमुळे विवाहित महिलांना होणारा मानसिक व शारीरिक छळ, मारहाण तसेच हुंड्यासंबंधित छळामुळे घडणाऱ्या मृत्यूच्या घटनांविषयी माहिती देऊन जनजागृती केली. आंब्रड येथील हा मेगा ड्राइव्ह कॅम्प २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून ग्रामपंचायतीमध्ये विधी स्वयंसेवक उपस्थित आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळण्यासह पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत होत आहे. नागरिकांनी विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा नागरिकांना कोणतीही कायदेशीर अडचण असल्यास किंवा कायदेविषयक मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती, कुडाळ यांच्याशी संपर्क साधावा. संबंधितांना आवश्यक ते कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'