ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत एकरकमी परतावा योजना 31 मार्च 2027 पर्यंत; लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग, (जिमाका) दि. 27 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित तसेच उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (One Time Settlement) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जरकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मुदत कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना आदी योजनांद्वारे कर्जवाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्जदार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. संपूर्ण थकीत कर्जरकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर 50 टक्के सवलत देण्यात येईल.
जिल्ह्यातील महामंडळाच्या सर्व थकबाकीदार लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा व कर्जमुक्त व्हावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. जिल्हा व्यवस्थापक 8668898950 किंवा दूरध्वनी क्रमांक 02362-228119 या क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment