जलसंवर्धनाच्या दिशेने पेंडूर ग्रामपंचायतीचे महत्त्वपूर्ण पाऊल! विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानांतर्गत शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग, दि. ३१ : दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच गावातील भूजल पातळी वाढवून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पेंडूरच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानांतर्गत ग्रामपंचायत पेंडूर येथे शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कामांचा शुभारंभ पंचायत समिती वेंगुर्लाचे सभापती शंकर घारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास पेंडूर गावचे सरपंच संतोष दशरथ गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, सदस्य महादेव नाईक, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, पंचायत समिती तांत्रिक सहाय्यक विवेक शिरसाट, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विवेक तिरोडकर, पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, लाभार्थी तानाजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली नाईक, घनश्याम नाईक, अंकुश गावडे यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी संतोष नाईक, अंकुश नाईक, तनुजा नाईक, विलास शेट्ये आदींची उपस्थिती होती.
पावसाचे पाणी अडवा, जमिनीत जिरवा!
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे, पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे आणि गावाला जलसमृद्ध बनविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. शोषखड्डे व जलतारा यांसारख्या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्यास मदत होणार असून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
'जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक ग्रामस्थाची सामूहिक जबाबदारी आहे', या भावनेतून ग्रामपंचायत पेंडूरच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम गावाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
गावाच्या विकासासोबतच नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीसमस्या दूर करण्यासाठी अशा प्रकारची कामे प्रत्येक गावात प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
ग्रामपंचायत पेंडूरच्या या जलसंवर्धनपर उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी कौतुक केले.
🌱 पाणी अडवा, पाणी जिरवा... जलसमृद्ध गाव घडवा!
००००००




Comments
Post a Comment