सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगात ऑनलाइन सुनावणी सुरू पक्षकार आणि वकिलांच्या वेळेची व खर्चाची बचत; ई-जागृती पोर्टलवर सुनावणीची लिंक उपलब्ध
सिंधुदुर्ग, दि. १३ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये २३ सप्टेंबर २०२६ पासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन सुनावणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे पक्षकार आणि वकिलांना आयोगात प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी होता येणार आहे.
या सुविधेची माहिती देण्यासाठी तसेच ऑनलाइन सुनावणीची प्रक्रिया, उपलब्ध सुविधा आणि संभाव्य अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आयोगातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा वकील संघ आणि तालुका वकील संघ यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऑनलाइन सुनावणीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा आयोगात विविध ग्राहक तक्रारी तसेच अंमलबजावणी अर्जांची सुनावणी घेतली जाते. संबंधित प्रकरणातील पक्षकार किंवा त्यांचे वकील यांना नियोजित तारखेला सिंधुदुर्गनगरी येथील आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास, आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीत सहभागी होता येईल.
या सुविधेमुळे पक्षकार व वकिलांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार असून, प्रत्यक्ष उपस्थित राहण्यात येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नियोजित तारखेला उपस्थित राहता न आल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येणार आहेत.
ऑनलाइन सुनावणीची लिंक केंद्र शासनाच्या ‘ई-जागृती’ (e-Jagriti) पोर्टलवर तसेच आयोगाच्या दैनिक कामकाजाच्या यादीवर (डेली बोर्ड) उपलब्ध करून देण्यात येते. संबंधित पक्षकार आणि वकिलांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष इंदुमती मलुष्टे, सदस्य रसिका निकुंभ आणि योगेश खाडिलकर यांनी केले आहे.
००००००००
Comments
Post a Comment