महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

सिंधुदुर्ग, दि. २६ : महर्षी वाल्मिकी यांचे जीवनचरित्र आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य आपल्याला सातत्याने आत्मपरीक्षण करण्याची, स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याची आणि जीवनात उच्च मूल्यांची जोपासना करण्याची प्रेरणा देते. व्यक्तीची महानता तिच्या भूतकाळावर नव्हे, तर तिच्या विचारांवर, परिश्रमांवर आणि कृतीवर ठरते, हा संदेश महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातून मिळतो. रामायणातील आदर्श मूल्ये आत्मसात करून ती भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त केले. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासासह भारतीय साहित्यविश्वाला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महर्षी वाल्मिकी यांना भारतीय परंपरेत आदिकवी म्हणून गौरविण्यात येते. संस्कृत भाषेत रचलेल्या रामायण या महाकाव्यात सात कांडांमधून श्रीरामांचे जीवन, त्यांचा आदर्श, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि नैतिक मूल्यांचे दर्शन घडते. सुमारे २४ हजार श्लोकांचा समावेश असलेल्या या महाकाव्याने भारतीय समाजजीवन, साहित्य आणि संस्कृतीवर दीर्घकालीन प्रभाव टाकला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'