नोटीस प्राप्त मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन
सिंधुदुर्ग, दि. १ (जिमाका) : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जुळवणी न झालेल्या (No Mapping) किंवा तार्किक विसंगती (Logical Discrepancy) असलेल्या मतदारांच्या पडताळणी व सुनावणी प्रक्रियेबाबत सुधारित सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नोटीस प्राप्त झालेल्या संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.
ज्या मतदारांना सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) भेट देऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे जमा करून घेतील. प्राप्त कागदपत्रांच्या आधारे संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी पुढील निर्णय घेतील. नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे व पुरावे व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही संबंधित BLO कडे सादर करता येतील.
तार्किक विसंगती (Logical Discrepancy) असलेल्या मतदारांच्या बाबतीत केवळ संबंधित विसंगतीशी निगडित आवश्यक कागदपत्रे व पुरावे प्राप्त करून घेण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार BLO यांच्या पडताळणी अहवाल अथवा पंचनाम्याच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
अपवादात्मक परिस्थितीतच सुनावणी : विहित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतील. अशा सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते.
मतदार नोंदणीसाठी दि. ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील.
बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी, विशेषतः PVTG गटातील व्यक्ती, अनाथ तसेच अन्य असुरक्षित गटातील मतदारांसाठी आवश्यकतेनुसार विशेष शिबिरे व मदत कक्ष आयोजित करण्यात येणार आहेत. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्याचे निर्देश सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास संबंधित मतदारास कागदपत्रे सादर करण्याची तसेच सुनावणीची पूर्ण संधी दिल्यानंतरच पुढील आदेश पारित करण्यात येईल.
मतदारांशी संपर्क साधणे तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करून घेण्याच्या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्याशी समन्वय ठेवतील.
नोटीस प्राप्त सर्व संबंधित मतदारांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment