जागतिक हात धुवा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे आवाहन

सिंधुदुर्गन, दि. १४ (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येतो. हात स्वच्छ धुण्याच्या सवयीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे. यावर्षी जागतिक हात धुवा दिनाची संकल्पना “Our Future is at Hand – Let’s Move Forward Together” अशी आहे. हात स्वच्छ धुण्याची सवय अंगीकारून निरोगी भविष्याच्या दिशेने सामूहिक प्रयत्न करण्याचा संदेश या संकल्पनेतून देण्यात येत आहे. हात स्वच्छ धुणे ही संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सवय आहे. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच दैनंदिन कामकाजादरम्यान आवश्यक त्या वेळी साबणाने हात धुणे गरजेचे आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे डॉ. बासुर यांनी सांगितले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी साबणाने हात धुण्याची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून हात स्वच्छ धुण्याचे आरोग्यविषयक महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून साबण संकलनासाठी रॅली काढून हात धुण्याच्या सवयीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शाळांमध्ये हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. शाळा आणि गावपातळीवर रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला व पोस्टर निर्मिती यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढविण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी दिली. ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’ हा संदेश प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावा. हात धुण्याची सवय केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी या जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. बासुर यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'