पंचायत समिती सावंतवाडीच्या वतीने बांदा येथे शोष खड्डे बांधकामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना देणारा उपक्रम

सावंतवाडी, दि. ३१ : ग्रामीण भागातील घरगुती सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून गावांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत शोष खड्डे बांधकाम उपक्रमाचा शुभारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत बांदा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमाचा शुभारंभ प्रमोद कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, ग्रामपंचायत बांदाच्या सरपंच प्रियंका नाईक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शोष खड्डे हा ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त आणि पर्यावरणपूरक उपक्रम आहे. घरातून निर्माण होणारे सांडपाणी शोष खड्ड्याद्वारे जमिनीत मुरविल्यामुळे परिसरात सांडपाण्याची डबकी साचत नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्ती, अस्वच्छता आणि संभाव्य रोगराईला आळा घालण्यास मदत होते. तसेच जमिनीतील ओलावा टिकविणे आणि भूजल पुनर्भरणास हातभार लावणे शक्य होते. शोष खड्ड्यातील पाण्याचा योग्य वापर करून परसबागेतील भाजीपाला, केळी व इतर उपयुक्त झाडांच्या लागवडीस प्रोत्साहन मिळू शकते. परिणामी घरगुती पोषणसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत या कामाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने शोष खड्ड्यांच्या बांधकामातून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार आहे. ‘प्रत्येक घरात शोष खड्डा – स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी गावाचा ध्यास!’ या संकल्पनेतून सावंतवाडी तालुक्यात सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील आहे. स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, पोषणसुरक्षा आणि रोजगारनिर्मिती या सर्व बाबींचा समन्वय साधणारा हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सावंतवाडी तालुक्यात ६३०० शोष खड्डे खोदण्यात येणार असून त्यातून ८८००० मनुष्य दिवस निर्मिती होणार असून १.५० कोटी रुपये मजुरी मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने शोष खड्ड्यांचा स्वीकार करून आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छ, सुंदर, निरोगी गाव निर्मितीच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'