जलसंधारण लोकचळवळीला सिंधुदुर्ग पोलीस दलाचे पाठबळ; डिंगणे आणि चिपी येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणी पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, अंमलदार आणि ग्रामस्थांचे श्रमदान; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत लोकसहभाग

सिंधुदुर्ग, दि.१९ : जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. केवळ कायदा व सुव्यवस्थेचे कर्तव्य बजावण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत निसर्ग संवर्धन आणि जलसाठा वाढविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाने डिंगणे (ता. सावंतवाडी), बांदा परिसरासह चिपी वाडी येथे वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीत सहभाग घेतला. या उपक्रमातून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. डिंगणे, बांदा येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या उपक्रमात पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी स्वतः सहभागी होत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसोबत श्रमदान केले. जलसंधारणाच्या कामात पोलीस दलाने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून लोकसहभागातून जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी अशा स्थानिक पातळीवरील उपाययोजना उपयुक्त ठरतात. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. याच मोहिमेअंतर्गत चिपी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चिपी वाडी येथील ओढ्यावर बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या कामात निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चिपीचे पोलीस पाटील, आरोग्य पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ एकत्र आल्याने जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळाली. जलसंधारण ही केवळ एखाद्या विभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातून पुढे जाणारी चळवळ आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, भूजलसाठ्याचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व आहे. पोलीस दलाच्या सहभागामुळे जलसंधारणाच्या कामाला पाठबळ मिळण्याबरोबरच सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘आजचे श्रमदान, उद्याची जलसमृद्धी!’ या भावनेतून सिंधुदुर्ग पोलीस दलाने जलसंधारण लोकचळवळीत आपला सहभाग नोंदविला. ‘कर्तव्य आमचे, सुरक्षा तुमची!’ हे ब्रीद जपत समाजहित आणि निसर्ग संवर्धनासाठीही पोलीस दलाने पुढाकार घेतल्याचे या उपक्रमातून दिसून आले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'