मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा; दावे व हरकती दाखल करण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग, दि. ३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली असून सुधारित वेळापत्रक निर्गमित केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार हे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे. प्राप्त झालेले दावे व हरकती निकालात काढणे तसेच नोटीस टप्प्यासाठी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली असून, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार पुढील सर्व कामकाजाचे नियोजन करतील. प्राप्त झालेले दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत. तालुका व मतदारसंघ स्तरावर सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी व बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना या सुधारित वेळापत्रकाबाबत लेखी पत्राद्वारे तात्काळ अवगत करण्यात आले आहे. दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित कालावधीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'