पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकातून येणाऱ्या पिढीला परिवर्तनाचे संदेश अनुभवायला मिळतील - पालकमंत्री नितेश राणे हेत (ता.वैभववाडी जि. सिंधुदुर्ग) येथे त्यांच्या स्मारकाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये निधीतून उभे राहणार स्मारक

सिंधुदुर्ग, दि. १५ : मराठी साहित्यविश्वात कष्टकरी, श्रमिक आणि सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला आपल्या कवितेतून समर्थ अभिव्यक्ती देणारे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळगावी त्यांच्या जयंती दिवशी हेत, ता. वैभववाडी येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम पुढील एका वर्षात पूर्ण करण्याचा मानस असून, समारकातून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा वारसा जतन होईल आणि भावी पिढीला त्यांच्या विचारांची ओळख होईल, असे पालकमंत्री राणे यांनी यावेळी नमूद केले. यावेळी ते म्हणाले, स्मारकाच्या उभारणीसोबतच त्याचा दर्जा, देखभाल आणि संवर्धन यांनाही प्राधान्य देण्यात यावे. नारायण सुर्वे हे कोकणातील अनमोल रत्न असून, त्यांच्या साहित्याने कष्टकरी, कामगार आणि उपेक्षित समाजाच्या व्यथा, वेदना व संघर्षाला प्रभावीपणे वाचा फोडली. या स्मारकात केवळ वास्तू उभारण्यापुरता मर्यादित दृष्टिकोन न ठेवता, त्यांचा जीवनप्रवास, त्यांच्या कविता आणि त्यातून व्यक्त झालेले सामाजिक वास्तव यांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांच्या साहित्यामधून येणाऱ्या पिढीला परिवर्तनाचे संदेश अनुभवायला मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेतील ओळी सादर करून त्यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन केले. स्मारक परिसरात वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह, कार्यालय, बाहेरील बाजूस बहुउद्देशीय व्यासपीठ तसेच स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधांच्या माध्यमातून साहित्यविषयक उपक्रम, अभ्यास आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळेल. त्याचबरोबर स्मारकाची स्वच्छता, नियमित देखभाल आणि संवर्धन यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. हेत ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी समन्वयाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. स्मारकाच्या उद्घाटनासाठी खासदार नारायण राणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सुर्वे यांनी आपल्या लेखणीतून कष्टकरी, शोषित आणि कामगार वर्गाच्या जीवनातील वास्तव प्रभावीपणे मांडले. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली’ या त्यांच्या ओळींमधून कामगारांच्या संघर्षाचे चित्र स्पष्ट होते. त्यांच्या साहित्याने कामगार चळवळीला प्रेरणा दिली, तसेच शोषित आणि वंचित समाजामध्ये आपल्या हक्कांविषयी जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांची लेखणी ही समाजपरिवर्तनाची ताकद ठरली असून, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मूळगावी स्मारक उभारण्याचा उपक्रम हा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, सुभाष रावराणे, श्रावणी रावराणे, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, सचिन काटकर, सरपंच कांचन कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी, भालचंद्र साठे, हेत ग्रामस्थ तसेच सुर्वे कुटुंबीयातील बाळकृष्ण सुर्वे, मधुकर सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, रमाकांत सुर्वे उपस्थित होते. कार्यक्रमावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन आणि कामाच्या शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. कवी नारायण सुर्वे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात स्मारकाची माहिती दिली. यावेळी उपस्थित माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, किशोर कांबळे, त्यांच्या कुटुंबातील बाळकृष्ण सुर्वे, माजी सभापती भालचंद्र साठे यांनी मनोगत व्यक्त केले. वाचन दिनानिमित्त शालेय विद्यार्थिनीने कवी सुर्वे यांची माझी आई ही कविता सादर केली. गावच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री राणे यांच्या हस्ते स्मारकासाठी जागा विनामोबदला दिल्या बद्दल श्रीमती साळवी यांचा सन्मान करण्यात आला. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'