जलसंधारणाच्या लोकचळवळीला मिळणार अनुभवांचे शब्दरूप; ‘जलनीती’ उपक्रमात अनुभवकथन, गद्य-पद्य, कविता, चारोळी, छायाचित्रे व व्हिडिओ पाठविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २२ (जिमाका) : पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे श्रमदान, जलसंधारणासाठी एकवटलेली ग्रामशक्ती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान… या लोकचळवळीतील अनुभवांना आता शब्दांतून आणि दृकश्राव्य माध्यमांतून अभिव्यक्ती देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जलनीती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जलसंधारणाच्या कामात सहभागी झालेल्या नागरिकांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवकथन, कथा, गद्य-पद्य लेखन, कविता, चारोळी यांसह छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. जिल्ह्यात पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने वनराई बंधारे, गॅबियन बंधारे, जलतारा, शोषखड्डे आदी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेण्यात येत आहेत. या कामांमध्ये ग्रामस्थ, महिला, युवक, स्वयंसेवक तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. श्रमदानातून घडणारी ग्रामस्थांची एकजूट, पाण्यासाठी घेतले जाणारे सामूहिक परिश्रम आणि स्थानिक पातळीवर पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचे योगदान हे या चळवळीचे महत्त्वाचे पैलू आहेत. हे अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, हा ‘जलनीती’ उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. जलसंधारणाच्या कामात सहभागी होताना आलेले अनुभव, श्रमदानातून मिळालेला आनंद, गावकऱ्यांनी एकत्र येऊन उभा केलेला बंधारा, त्यामागील प्रेरणा आणि या कामातून मिळालेली शिकवण आपल्या शब्दांत मांडता येणार आहे. अनुभवकथन, ललित लेखन, गद्य-पद्य, कविता, चारोळी अशा विविध साहित्यप्रकारांतून आपले विचार व्यक्त करता येतील. तसेच जलसंधारणाच्या कामादरम्यान टिपलेली छायाचित्रे, श्रमदानाचे व्हिडिओ आणि या उपक्रमाशी संबंधित अन्य दृकश्राव्य साहित्य पाठवूनही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. यासाठी साहित्यिक लेखनशैलीची कोणतीही अट नसून, अनुभवातील प्रामाणिकपणा आणि जलसंधारणाच्या कामाशी असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे. आपण प्रत्यक्ष सहभागी झालेल्या कामाचे स्वरूप, संबंधित गाव व तालुका, श्रमदानातील आठवणी, सहभागी नागरिकांचा उत्साह, आलेल्या अडचणी आणि त्या दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न यांचे सहज, सोप्या भाषेत वर्णन करता येईल. कविता किंवा चारोळीच्या माध्यमातूनही पाण्याचे महत्त्व, निसर्गसंवर्धन आणि लोकसहभागाचा संदेश प्रभावीपणे मांडता येणार आहे. जलसंधारणाच्या कामामुळे परिसरातील पाणीसाठा, विहिरी व कूपनलिकांमधील पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी पाण्याची गरज आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यांबाबत जाणवलेले बदल अनुभवाधारित पद्धतीने मांडता येतील. त्यातून इतर गावांनाही जलसंधारणाच्या कामासाठी प्रेरणा मिळू शकेल आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृतीला चालना मिळेल. जलसंधारणाच्या या लोकचळवळीचा आपणही एक भाग असाल, तर आपला अनुभव शब्दांतून, कवितेतून, चारोळीतून किंवा छायाचित्रे व व्हिडिओंच्या माध्यमातून व्यक्त करा. नागरिकांसह जलसंधारणाच्या कामात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही ‘जलनीती’ उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. साहित्य व दृकश्राव्य साहित्य पाठविण्यासाठी ई-मेल : jalneeti.sindhudurg@gmail.com 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'