हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे परबवाडा-आंब्रड येथे कार्यक्रम
सिंधुदुर्ग, दि. 12 (जिमाका) : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पोषण माह सप्ताहानिमित्त हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परबवाडा-आंब्रड येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, लोक अभिरक्षक श्वेता तेंडुलकर आणि लोक अभिरक्षक कार्यालयातील रुचा लोखंडे उपस्थित होत्या.
यावेळी दीपलक्ष्मी पडते यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. श्वेता तेंडुलकर यांनी हुंडाबळीच्या समस्येबाबत माहिती देताना हुंड्याच्या मागणीवरून विवाहित महिलांचा होणारा मानसिक व शारीरिक छळ, मारहाण तसेच हुंड्यासंबंधीच्या छळामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांबाबत जनजागृती केली. हुंडा देणे व घेणे याला विरोध करणे, मुलींच्या शिक्षणाला व स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे, महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठविणे आणि हुंडाविरोधी कायद्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हुंडाबळी ही गंभीर सामाजिक समस्या असून, ती दूर करण्यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रुचा लोखंडे यांनी सामाजिक अनिष्ट प्रथांमुळे समाजाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, तसेच व्यक्तींच्या हक्कांवर आणि जीवनावर विपरीत परिणाम होतो, असे सांगितले. या प्रथा रोखण्यासाठी शिक्षणाचा प्रसार, जनजागृती, स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन, अंधश्रद्धा व भेदभावाला विरोध आणि कायद्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
00000

Comments
Post a Comment