सिंधुदुर्गात वित्तीय समावेशन अभियानासाठी जिल्हास्तरीय नियोजन बैठक संपन्न

सिंधुदुर्ग, दि. १९ : केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या वित्तीय समावेशन योजनांच्या संतृप्ती अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समिती (DLCC) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक ऋषिकेश गावडे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. बैठकीस निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख शिरसाट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, एनआरएलएमचे निलेश वालावलकर, नाबार्डच्या दिपाली माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले तसेच विविध बँकांचे समन्वयक व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समावेशन योजनांचा लाभ शंभर टक्के पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, डिजिटल बँकिंग सुविधा तसेच वित्तीय साक्षरता उपक्रमांचा व्यापक प्रसार करण्यावर भर देण्यात आला. यावेळी प्रत्येक गावात विशेष बँकिंग शिबिरे आयोजित करून बँक खाती उघडणे, आधार संलग्नता, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी वाढविणे तसेच डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासन, बँका, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाबार्ड, एनआरएलएम व इतर संबंधित विभागांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'