सफाई कामगारांना शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने द्या राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे निर्देश
सिंधुदुर्ग,(जिमाका) दि. ९ : सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने निवासस्थाने उपलब्ध करून देणे, त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती व सायकली देणे, निवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीविषयक लाभ प्रदान करणे, समाजगृहे उपलब्ध करून देणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही येत्या तीन महिन्यांत पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम, २०१३ च्या अंमलबजावणीसह सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणींच्या निराकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्यासह नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांची मंजूर, भरलेली व रिक्त पदे, तसेच नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या याबाबत सविस्तर माहिती घेतली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यासंदर्भातील शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसाहक्काने नियुक्त्या देण्याची प्रक्रिया गतिमान करावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याचे आभा कार्ड असल्याची खात्री करून त्यांना कार्डची प्रत उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.
सफाई कर्मचारी समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व विभागांनी मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि जीवनमान उंचावण्याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत. तसेच स्वयंरोजगाराच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.
निवृत्त होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान, रजा रोखीकरण यांसह सर्व देय लाभ मिळणे आवश्यक आहे. यासाठी निवृत्तीपूर्वीच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे निर्णय वेळेत घ्यावेत आणि २०२४ च्या शासन निर्णयानुसार लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. पुढील दोन महिन्यांत प्रलंबित कामांचा निपटारा करून त्याचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तीन महिन्यांनंतर सर्व संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डागोर यांनी सांगितले.
०००००
--



Comments
Post a Comment