नशामुक्त भारत अभियानांतर्गत ऑनलाईन योग व प्रतिज्ञा मोहिमेत सहभागी व्हावे

जिल्हास्तरीय समिती, शैक्षणिक संस्था, युवक-विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे आवाहन सिंधुदुर्ग, दि. 16 (जिमाका) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत देशभरात नशामुक्त भारत अभियान (NMBA) राबविण्यात येत आहे. या अभियानाची व्याप्ती वाढविण्यासह जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या सहकार्याने ऑनलाईन योग व नशामुक्त भारत प्रतिज्ञा मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. या मोहिमेचा प्रारंभ 5 ऑक्टोबर 2026 पासून झाला असून, 14 दिवसांच्या कालावधीत मोफत ऑनलाईन थेट योग सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. दररोज सात बॅचेसमध्ये पाच भाषांतून योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि तणाव व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मोहिमेच्या समारोपप्रसंगी प्रतिज्ञा दिवस आयोजित करण्यात येणार असून, परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मिनिटांचे ध्यान सत्र होणार आहे. त्यानंतर सहभागींकडून नशामुक्त भारताची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. भारत सरकारच्या सूचनांनुसार, जिल्ह्यातील नशामुक्त भारत अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीतील संबंधित विभाग व यंत्रणा, शैक्षणिक संस्था, युवक-विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. योग, ध्यान आणि सकारात्मक जीवनशैलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. नोंदणीसाठी लिंक : https://challenge.srisriyoga.in/oct26/user-msji सदर नोंदणी लिंक नशामुक्त भारत अभियानाच्या अधिकृत पोर्टलवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'