पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन; वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग, दि. 21 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आलेल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन तसेच मान्यताप्राप्त स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राणे यांनी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती घेत प्रत्यक्ष वाहन तपासणी प्रक्रियेची पाहणी केली. स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची तांत्रिक स्थिती आणि योग्यता आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने निर्धारित निकषांनुसार तपासली जाणार आहे. विशेषतः परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता तपासणी प्रक्रियेत वस्तुनिष्ठता, अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी प्रक्रियेला या सुविधेमुळे आधुनिक स्वरूप प्राप्त होणार असून, तपासणीतील सुसूत्रता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. याच कार्यक्रमात मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्गाच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे वाहन चालक परवाना मिळविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वाहन चालविण्याच्या कौशल्यांचे निर्धारित निकषांनुसार वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे चाचणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करून एकसमान निकषांवर आधारित मूल्यमापन करणे शक्य होणार आहे. सक्षम आणि प्रशिक्षित वाहनचालक घडविण्यासह रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे तसेच परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'