महा-उपलब्धी ॲपसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदत केंद्रे सुरू निवृत्तीवेतनधारकांनी नोंदणीसाठी मदत केंद्रांचा लाभ घ्यावा; १ नोव्हेंबरपासून ॲपद्वारे जीवनप्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा
सिंधुदुर्ग, दि. १३ (जिमाका) : राज्य शासनाच्या कोषागार कार्यालयांमार्फत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘महा-उपलब्धी’ या एकात्मिक मोबाईल ॲपच्या नोंदणीसाठी जिल्ह्यात मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी येथील तालुका उपकोषागार कार्यालयांमध्ये ही मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे निवृत्तीवेतनधारकांना वित्तीय वर्ष २०२४-२५ पासून प्रदान करण्यात आलेल्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा सविस्तर तपशील, उत्पन्नाचा दाखला, दि. २४ ऑगस्ट २०२३ पासूनचे ई-पीपीओ, ई-जीपीओ व ई-सीपीओ तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ पासूनचे फॉर्म-१६ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय निवृत्तीवेतनविषयक महत्त्वाचे शासन निर्णय आणि सूचना घरबसल्या पाहण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध आहे.
१ नोव्हेंबरपासून जीवनप्रमाणपत्राची सुविधा
येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून या ॲपद्वारे जीवनप्रमाणपत्र सादर करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी ॲप डाउनलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
मदत केंद्रांची वेळ व आवश्यक कागदपत्रे
ही मदत केंद्रे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत सुरू राहतील. मदत केंद्रात येताना निवृत्तीवेतनधारकांनी आपला पीपीओ क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच अँड्रॉइड किंवा आयओएस प्रणाली असलेला मोबाईल हँडसेट सोबत आणावा.
निवृत्तीवेतनविषयक माहिती डिजिटल स्वरूपात सहज उपलब्ध व्हावी आणि विविध सेवा घरबसल्या मिळाव्यात, यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी ‘महा-उपलब्धी’ ॲपचा वापर करून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे
०००००००
Comments
Post a Comment