जलसंधारणाच्या कामांमुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून पाहणी ग्रामस्थांशी संवाद साधून जलसंधारण कामांच्या परिणामांचा घेतला आढावा
सिंधुदुर्ग, दि. १८ : जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील यापूर्वी पूर्ण झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी केली. या कामांमुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे भूजलसाठ्यात झालेली वाढ आणि त्याचा स्थानिक पाणी उपलब्धतेवर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत ग्रामस्थांनी आपले अनुभव जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह ग्राम विकास, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून जलसंधारणाच्या कामांमुळे परिसरातील पाण्याच्या उपलब्धतेत झालेल्या बदलांची माहिती घेतली. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याच्या उपाययोजनांमुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीसाठ्यात झालेली वाढ हा जलसंधारणाच्या कामांचा महत्त्वपूर्ण परिणाम असल्याचे त्यांच्या अनुभवांतून स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, पावसाचे पाणी अडविणे आणि भूजल पुनर्भरणाला चालना देणे आवश्यक आहे. यासाठी यापूर्वी झालेल्या जलसंधारण कामांची देखभाल व दुरुस्ती करण्याबरोबरच स्थानिक गरजांनुसार नवीन उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे सातत्याने सुरू ठेवल्यास गावातील पाणी उपलब्धता वाढविण्यास मदत होऊ शकते.
००००००००




Comments
Post a Comment