सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

सिंधुदुर्ग, दि. ३१ (जि.मा.का.): भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचा गौरव केला. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंध बनविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच अखिल भारतीय सेवांचे (ऑल इंडिया सर्व्हिसेस) भक्कम प्रारूप उभारण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. देशासमोरील अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय अखंडतेच्या आव्हानांचा विचार करता, त्यांनी रुजवलेली देशभक्तीची मूल्ये आणि राष्ट्रप्रेम जपणे आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय विविध आव्हानात्मक परिस्थितीत देशाचे नेतृत्व केले. प्रतिकूल परिस्थितीतही ठाम निर्णय घेणे, घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहणे आणि देशाला आर्थिक व सामरिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, हे त्यांच्या नेतृत्वातून शिकण्यासारखे असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले. ०००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'