मिठबाव येथे लोकसहभागातून वनराई बंधारा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे ग्रामस्थांसोबत श्रमदान नागरिक, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी व शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्ग (देवगड), दि. ८ : लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवगड तालुक्यातील मिठबाव येथे भंडारवाडी येथील ओहळावर वनराई बंधारा उभारण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करीत या उपक्रमात सहभाग घेतला. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचत गट तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केल्याने जलसंधारणाच्या कामाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शीतल जाधव, गट विकास अधिकारी निलेश जगताप, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, श्याम कदम तसेच गावस्तरावरील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भंडारवाडी येथील ओहळावर तीन ठिकाणी तीन वनराई बंधारा उभारण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्रितपणे श्रमदान केले. पाणी अडविणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे तसेच परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने अशा स्थानिक पातळीवरील जलसंधारणाच्या कामांना महत्त्व आहे. लोकसहभागातून उभारण्यात येणारे वनराई बंधारे हे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी उपयुक्त ठरत असून, त्यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. या उपक्रमात रामेश्वर हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, अध्यापक विद्यालय मिठबाव तसेच केळकर कॉलेज, देवगडच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवित गावाच्या जलसुरक्षेसाठी सामूहिक जबाबदारीची भावना अधोरेखित केली. जलसंधारणासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता गावागावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरज आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून उभारण्यात येणाऱ्या अशा लोकसहभागी उपक्रमांमुळे जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे आणि व्यापक प्रमाणावर राबविता येणार आहेत. श्रमदानात सहभागींच्या प्रतिक्रिया * राज प्रदीप कदम (डिग्रे कॉलेजचा विद्यार्थी): सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने 'पाणी आडवा, पाणी जिरवा' हा उपक्रम हाती घेतला असून, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन वनराई बंधारा उभारला आहे. सर्वानीच हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा असे आवाहन त्यांनी केले. * प्रसाद पुंडलिक लोके (गाव मिठबाव): दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना आणि पालिकामंत्री नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या वतीने 'वनराई बंधारा' ही योजना राबवली जात आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थ सर्वजण मिळून उत्तम सहकार्य करत असून अशा उपक्रमांमुळे गावाला नक्कीच फायदा होईल. * मंजिरी मिलिंद मांजरेकर (गाव मिठबाव): शासनाचा 'पाणी आडवा, पाणी जिरवा' हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेमुळे दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'