निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा

सिंधुदुर्ग, दि. २४ (जिमाका) : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने गठित समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतील विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष उपेंद्र तामोरे, समिती सदस्य विशाल नाईक, सदस्य सचिव तुषार गवळी, दक्षता पथकाच्या पोलीस उपअधीक्षक प्रतिक्षा खेमनाळकर आणि पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील उपस्थित होते. बैठकीत कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील प्राप्त अर्ज, वितरित करण्यात आलेली जात प्रमाणपत्रे, नामंजूर प्रस्ताव, दक्षता पथकाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव तसेच समिती स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयांकडून जून २०२६ नंतर तपासण्यात आलेले नवीन अभिलेख, त्यामध्ये आढळलेल्या अतिरिक्त नोंदी, या नोंदींच्या आधारे नागरिकांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज, वितरित प्रमाणपत्रे आणि प्रलंबित अर्जांची सद्यस्थिती याबाबतही माहिती घेण्यात आली. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पात्र नागरिकांच्या अर्जांवर नियमांनुसार कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बैठकीत संबंधित कार्यालयांमधील अभिलेख तपासणी, अर्जांची स्थिती, प्रमाणपत्र वितरण आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत आढावा घेण्यात आला. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'