पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँक शाखांना पत्र द्या केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावे - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) -पीक कर्ज वाटपात ज्या बँकांची कामगिरी असमाधानकारक आहे. त्या बँकांच्या प्रत्येक शाखांना उद्दिष्ट पूर्ततेसाठी पत्र पाठवून गंभीर सूचना द्यावी. जिल्हा समन्वयकांनी तालुकास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करुन प्रधानमंत्री किसान योजनेतर्गंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे,त्यांना किसान क्रेडीट कार्ड द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अजय थुटे, रिझर्व बँकेचे नरेंद्र कुमार कोकरे, आरसीटीचे संचालक राजाराम परब आदी उपस्थित होते. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकेश मेश्राम यांनी जिल्ह्यातील बँकांच्या कामगिरीचा आढावा देताना जिल्ह्याच्या सीडी रेशो 48.50 टक्के असल्याचे सांगितले. पीक कर्ज वाटपामध्ये उद्दिष्ट 30 जून 2022 पर्यंत 49 टक्के साध्य झाले आहे. जिल्ह्यात 147.77 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्राधान्य क्षेत्रात 1 हजार 906 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या 24 टक्के आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी, बँक ऑफ इंडियाने उद्दिष्टापेक्षा 114 टक्के तर युनियन बँक ऑफ इंडियाने 126 टक्के खरीपसाठी पीक कर्ज वाटप केल्याबद्दल अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, पीक कर्जाबाबत ज्या बँकांची कामगिरी असमाधानकारक आहे, त्या बँकांच्या सर्व शाखांना पत्रे पाठवून सूचना द्यावी. हा विषय गंभीरतेने घेण्याबाबत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेतर्गंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्याची तालुकास्तरीय यादी एनआयसीकडून मिळवावी त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याबाबत जिल्हा समन्वयकांनी पाठपुरावा करावा. जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाकरलेल्या प्रस्तावाबाबत पुन्हा एकदा पडताळणी करावी. विधवा महिलांसाठी आरसेटी आणि महिला बाल विकास विभागाने एक प्रशिक्षण आराखडा तयार करावा. त्यामध्ये महिलांना कोणत्या प्रकाराचा रोजगार उभारता येईल आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे याचा विचार करावा, अशी सूचनाही देवून, सर्वच बँकांनी शासनाच्या विविध योजनांमधील उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. *सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'