महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदार संघाचा मतदार यादयांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
अ.क्र. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे कालावधी
1 मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक दि.1 ऑक्टोबर, 2022 (शनिवार)
2 मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4)
अन्यये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी दि.15 ऑक्टोबर, 2022 (शनिवार)
3 मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4)
अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिध्दी दि.25 ऑक्टोबर, 2022 (मंगळवार)
4 नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दि.7 नोव्हेंबर, 2022 (सोमवार)
5 हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.19 नोव्हेंबर, 2022 (शनिवार)
6 प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.23 नोव्हेंबर, 2022 (बुधवार)
7 दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि.23 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) ते
दि.9 डिसेंबर, 2022 (शुक्रवार)
8 दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दि.25 डिसेंबर, 2022 (रविवार)
9 मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.30 डिसेंबर, 2022 (शुक्रवार)
शिक्षक मतदार संघासाठी प्रत्येक निवडणूकीपूर्वी नव्याने मतदार याद्या तयार करणे आवश्यक असल्याने पूर्वीच्या शिक्षक मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले तरी सुध्दा अशा व्यक्तीला विहित नमुन्यामध्ये नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.
नमुना 19 मधील अर्ज सर्व तहसील कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत. मतदार यादीत नाव नोंदणीचे नमुना 19 मधील अर्ज सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कोकण विभाग शिक्षक मतदार संघ /पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येतील.
जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, सर्वसामान्यपणे ज्या मतदार संघाची रहिवाशी आहे व जिने दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या 6 वर्षामध्ये राज्यातील एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले आहे. अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील.
शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी केलेल्या नमुना 19 मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
एखादी व्यक्ती अर्ज दाखल केलेल्या दिनांकास अध्यापनाचे काम करीत नसेल तर त्या व्यक्तीने अखेरीस ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम केले असेल त्या संस्थेच्या प्रमुखाने ते निवेदन अनुप्रमाणित करणे आवश्यक आहे.
तरी सर्व पात्र शिक्षक मतदारांनी, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जास्तीत नाव नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment