‘पार्थ’तेल गळती प्रतिबंधात्मक रंगीत तालीम मालवणमध्ये सद्यस्थितीत कोणताही धोका नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये -तहसिलदार अजय पाटणे

सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का.): ‘पार्थ’अपघातग्रस्त जहाजातून सुरु झालेल्या तेल गळतीचा सद्यस्थितीत कोणताही धोका नाही. प्रतिबंधात्मक उपायासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मालवण तहसिलदार अजय पाटणे यांनी केले. जिल्ह्यातील विजयदुर्ग ते देवगड समुद्रकिनारी ४० ते ४५ वावामध्ये बुडालेल्या पार्थ जहाजातील तेल गळती सुरु झाली असल्याने ते तेल समुद्र किनारी येण्याची शक्यता आहे. यासाठी उपाययोजना म्हणून तेलाचे काळे गठ्ठे समुद्रामध्येच रोखण्यासाठी व किनाऱ्यावर येऊन लागलेल्या तेलाला मासेमारी करणाऱ्या जाळ्याच्या सहाय्यातून बाहेर काढले जाणार असल्याची प्रात्यक्षिकही चिवला बीच समुद्र किनारी रत्नागिरी कोस्टल गार्डचे कमांडर सचिनसिंग यांनी दाखविले. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर,पोलीस निरिक्षक विजय यादव, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त आर.जी. मालवणकर आदी उपस्थित होते. विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात ‘पार्थ’ हे १०१ मी.लांबीचे तेलवाहू जहाज दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी अपघातग्रस्त झालेले होते. कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सदर जहाजातून दि.१९ सप्टेंबर २०२२ पासून तेल गळतीस प्रारंभ झालेला आहे. या तेलाचे पाण्यामध्ये तयार झालेले गठ्ठे समुद्रकिनारी येण्याची शक्यता असल्याने याची खबरदारी म्हणून रत्नागिरी कोस्टल गार्डचे कमांडर सचिन सिंग यांनी मालवण येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात प्रात्यक्षिक दाखविले. या वेळी आपत्ती पूर्व नियोजन व रंगीत तालीम शिबीर घेण्यात आले. तहसीलदार श्री. पाटणे म्हणाले, केंद्र शासनाच्या आदेशानुसार व काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून आपण कोस्टल गार्डच्या सहाय्याने मच्छीमारांच्या जाळ्यामधून समुद्रामध्येच तेलाचे गठ्ठे जाळ्यामध्ये जेरबंद करुन बाहेर काढण्यात कसे येतील, हे तेलाचे गठ्ठे कशा स्वरुपाचे आहेत, कसे हाताळायला पाहिजेत, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. जोपर्यंत प्रशासनामार्फत अधिकृत माहिती जाहीर होत नाही, तोपर्यंत समाज माध्यमावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'