17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा जलदगतीने करा - अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : अनेक प्रकरणी नागरिकांचे अर्ज / तक्रारी यांचा विहीत कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व प्रलंबित अर्ज/ तक्रारी यांचा निपटारा करण्याकरिता दि. 17 सप्टेंबर 2022 ते दि. 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व प्रलंबित अर्ज / तक्रारी यांचा निपटारा जलदगतीने करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्र.निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध खात्याचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. श्री. बर्गे म्हणाले, सर्वसामान्य जनतेची कामे विहीत कालावधीत व्हावीत, याकरीता राज्य शासनाने सन 2015 मध्ये "आपले सरकार सेवा पोर्टल" सुरु केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागाकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहीत कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी. अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. सर्व संबंधित विभागांच्या जिल्हाप्रमुखांनी सेवा पंधरवड्याचे यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करावे व या संबंधातील प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेण्यात यावा आणि क्षेत्रीय भेटी देण्यात याव्यात, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'